Pune Crime News | किर्लोस्कर कंपनीच्या रखवालदारांना दोघा चोरट्यांनी धमकावले आणि दोघा चोरट्यांनी बंद कंपनीत 5 रखवालदार असताना चोरट्याने चंदनाचे झाड नेले चोरुन
पुणे : Pune Crime News | खडकी येथील किर्लोस्कर कंपनीत यापूर्वी २ ते ३ वेळा चंदनाचे झाड चोरुन नेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्यावेळी चोरट्यांना ते शक्य झाले नव्हते. दोन चोरट्यांनी कंपनीतील रखवालदारांना शिवीगाळ करुन धमकाविले. त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी दोघा चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून ते जंगलात घेऊन पळून गेले. बंद कंपनीत ५ रखवालदार असताना चोरट्याने चंदनाचे झाड चोरुन नेले.
याबाबत रखवालदार ऋषिकेश खंडारे (वय २६, रा. नवी खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार किर्लोस्कर कंपनीमध्ये २४ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे किर्लोस्कर कंपनीत सिक्युरिटी सुपरवायजर म्हणून नोकरीस आहेत. खडकी येथील किर्लोस्कर इंडस्ट्रिज टेक सेंटर हा प्लँट मागील २० वर्षांपासून बंद आहे. खडकीतील कंपनीत १८ चंदनाची जुनी झाडे आहेत. या अगोदर २ ते ३ वेळा कंपनीच्या आवारामधून चंदनाचे झाडे चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. ऋषिकेश खंडारे हे नाईट शिफ्टमध्ये नोकरीवर होते. त्यांच्याबरोबर सिक्युरिटी गार्ड म्हणून आदेश कांबळे, पुरुषोत्तम वंगाटे, लल्लन कुमार, सुधाकर कांबळे हे ड्युटीवर उपस्थित होते.
रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास २ चोरटे ते ड्युटी करत असलेल्या किर्लोस्कर कंपनीचे पाठीमागील बाजुकडून आत आले. त्यांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी खंडारे यांनी आरडा ओरडा करुन, मदतीसाठी आवाज दिला. तसेच डायल ११२ वर कॉल करुन पोलिसांची मदत मागितली. दरम्यानचे काळात २ चोरट्यांनी किर्लोस्कर कंपनीचे आवारातील १ चंदनाचे झाड कापून चोरी करुन घेऊन गेले. ६ इंच गोलाई व ५ फुट लांबीचे ९ हजार रुपयांचे चंदनाचे झाड चोरुन नेले.
थोड्या वेळात पोलीस आले. त्यांनी व रखवालदार यांनी कंपनीचे पाठीमागील जंगल भागात तसेच आजू बाजूला शोध घेतला. परंतु, चोरटे मिळून आले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करीत आहेत.
