Pune News | प्रजासत्ताक दिनाचा अनोखा उत्सव: कसबा पेठेत मुलांची क्रिकेट खेळून उघड्यावर पडणाऱ्या घाणीवर मात

Pune News | Unique Republic Day Celebration: Children play cricket in Kasba Peth, overcoming the dirt that falls in the open

पुणे : Pune News |  दररोज वस्तीतील मोकळ्या जागेवर जिथे मध्यरात्री किंवा अगदी पहाटे कचरा टाकण्यासाठी लोक येतात, ती मोकळी जागा खेळण्यासाठी मिळवून लहान मुलांनी यावर्षीचा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला व वस्तीतील मोठ्यांना देखील अंतर्मुख होण्यास भाग पाडले.  

भीमनगर वस्तीतील १०-१५ वयोगटातील ३०-३५ मुलांनी स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिकेच्या साथीने वस्तीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ मोकळ्या जागेवर कचरा पडू नये यासाठी  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याच जागी क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा निश्चय केला.  ज्याठिकाणी माशा, डास, शेळ्या आणि भटक्या कुत्र्यांचा वावर असे त्या जागेचे खेळाच्या छोट्या मैदानात रूपांतर करण्यात आले. यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या समन्वयकांनी मुलांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि मुलांसोबत क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन देखील केले.

भीमनगर वस्ती परिसरात स्वच्छ आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम ‘स्वच्छता पेठ’ अंतर्गत सात दिवसांची कचरा संकलन सेवा राबवली जात आहे. कसबा व भवानी पेठ परिसरातील स्वच्छतेची गुणवत्ता सुधारावी,  सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील नागरिकांना समान दारोदार कचरा संकलन सेवा मिळावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे कचऱ्याचे ढिग किंवा ‘क्रॉनिक स्पॉट्स’ कमी व्हावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुलांसाठी तात्काळ झालेला हा बदल अर्थपूर्ण होता. “आधी हे ठिकाण पूर्णपणे कचऱ्याने भरलेले असायचे,” असे एका लहान सहभागी मुलाने सांगितले. “आता ही जागा स्वच्छ झाली आहे, त्यामुळे आम्ही इथे रोज खेळणार आहोत.” दुसऱ्या एका मुलाने सांगितले, “आता आमच्या परिसरात कुणीही रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत.”

हा उपक्रम वस्ती, कचरावेचक आणि महानगरपालिका यांच्यातील सामूहिक कृतीमुळे वस्तीमध्ये प्रत्यक्ष आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतात, हे दाखवून देतो. कालपर्यंत कचऱ्याचा ढिग असलेली ही जागा आता मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा बनली आहे. सार्वजनिक जागांवर लोकांचा हक्क आणि त्यासोबतच सामूहिक जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित होते.

२६ जानेवारी रोजी, पुणे मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक महेंद्र सावंत व आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोकादम सुनील चांदणे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या साथीने या जागी डीप क्लीनिंग केले, आणि स्वच्छ च्या समन्वयकांनी घरोघरी जाऊन उघड्यावर कचरा न टाकता कचरावेचकांना दारातच कचरा देण्याविषयी, कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती केली. मुलांनी पुन्हा मिळवलेल्या या जागेजवळील भिंतीवर एक स्पष्ट संदेश रंगवण्यात आला होता – “घाणीची पाडू विकेट, आता इथे फक्त क्रिकेट.”

You may have missed