Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अंदाजपत्रकात 10 टक्के मिळकत कर वाढीचे प्रशासनाचे सूतोवाच; निवडणुकीत 500 चौ.फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींच्या करमाफीचे भाजपपुढे आव्हान

Pune PMC News | Municipal administration promises 10 percent property tax hike in budget; BJP challenges tax exemption for residential properties up to 500 sq ft in elections

प्रशासनाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरही आश्‍वासनाप्रमाणे करमाफी दिल्यास महापालिकेचे उत्पन्न 70 कोटींनी कमी होणार

पुणे : Pune PMC News | महापालिकेचे २०२६- २७ या वर्षीचे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक येत्या महिन्याअखेरपर्यंत सादर होणार आहे. उत्पन्नवाढीसाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करामध्ये ८ ते १० टक्के वाढ करण्याचे प्रशासनाने सूचित केले आहे. दरम्यान, नुकतेच झालेल्या निवडणुकीत बहुमताने विजयी ठरलेल्या भाजपसह सर्वच राजकिय पक्षांनी प्रचारादरम्यान ५०० चौ.फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकत कर माफ करण्याचे आश्‍वासन दिल्याने प्रशासनाच्या नवीन करवाढी बाबत सत्ताधारी काय निर्णय घेणार? याची उत्कंठा वाढली आहे.

महापालिका निवडणुकीमुळे यंदा महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे वेळापत्रक चुकले आहे. निवडणूक निकालानंतर आचारसंहिता शिथिल झाल्याने या महिन्याअखेरपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. चालू वर्षीच्या तुलनेत आगामी अंदाजपत्रकामध्ये साधारण २०० ते २५० कोटी रुपयांची वाढ करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये केंद्र शासनाकडून समाविष्ट गावांच्या जीएसटीचे तसेच मुद्रांक शुल्क अधिभाराच्या थकित रकमेसोबतच मिळकत करामध्ये आठ ते दहा टक्के वाढ करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहेत.



दरम्यान, नुकतेच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकिय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पाचशे चौ.फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकत कर माफ करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. भाजपनेही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांंच्या ५०० चौ.फुटांपर्यंतच्या मिळकतीना मिळकत करामध्ये सवलत देण्यात येईल असे आश्‍वासीत केले आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये आकारणी झालेल्या १२ लाख ६९ हजार १६३ निवासी मिळकतींपैकी ४ लाख २९ हजार २४५ मिळकती या ५०० चौ.फुटांच्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी २५५ कोटी ५९ लाख रुपये कर आकारणी होेते. जाहीरनाम्यात दिलेेले आश्‍वासन पूर्ण करायचे झाल्यास महापालिकेला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

दुसरीकडे उरलेेल्या ८ लाख ३९ हजार ९१५ निवासी मिळकतधारकांवर प्रशासनाने सुचविलेली अधिकतम १० टक्के वाढ केल्यास सुमारे ९४ कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. तर व्यावसायीक १ लाख ६७ हजार ९३४ कोटी मिळकतींवर सध्या ९१३ कोटी ५५ टक्के उत्पन्न मिळते. यामध्ये दहा टक्के वाढ केल्यास साधारण ९१ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. ५०० चौ.फुटांवरील निवासी व सर्व व्यावसायीक मिळकतींवर एकूण १८५ कोटी रुपये उत्पन्न मिळाल्यानंतरही महापालिकेचे सुमारे ७० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न कमी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतेच सर्वसामान्य पुणेकरांना ५०० चौ.फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींची करमाफीचे आश्‍वासन पूर्ण करण्याबाबत सत्ताधारी भाजप स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर करताना काय निर्णय घेणार याबाबत उत्कंठा वाढली आहे.

You may have missed