Ajit Pawar | इतकी घाई खरंच गरजेची होती का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हवाई वाहतूकीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबाबत हवाई वाहतूकीतील तज्ञ धैर्यशील वंडेकर यांच्याशी केलेली ही बातचित
पुणे : Ajit Pawar | नगर पालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीय नेते मोठ्या प्रमाणावर छोटी विमाने, चार्टर आणि हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुदैवी निधन झाले. त्यामुळे इतकी घाई करायची खरंच गरज होती़ का?. विमान प्रवास सुरक्षित असला तरी एखादा अपघात हा त्यातील सर्वांचे प्राण घेतो, त्यामुळे विमान प्रवास व त्यासंबंधीच्या चर्चा जनतेत सुरु झाल्या आहेत. त्याबाबत हवाई वाहतूकीतील तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताने सातत्याने विमान वापराचा प्रश्न उपस्थित होत आहे का?
नाही. भारतात हवाई वाहतुकीची संख्या आणि वापर सातत्याने वाढत आहे. विमानतळांची संख्या वाढणे, नवीन विमान आणि हेलिकॉप्टर सेवा सुरू होणे, तसेच सरकारचे हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक धोरण यामुळे खाजगी हवाई प्रवास देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बारामतीला झालेला अपघात हे तसे दुर्मिळ असतात आणि एकूण असे पाहण्यात आले आहे की अशा घटनांमुळे खाजगी विमानांचा वापर कमी झालेला नाही. दिवसागणिक त्यासाठी वाढती मागणी आहे.
छोटी विमाने किती वापरावीत?
यावर कोणतेही बंधन नाही आणि असूही नये. हवाई वाहतूक हे जगातील सर्वात सुरक्षित वाहतूक साधनांपैकी एक मानले जाते व उपलब्ध डेटानुसार, व्यावसायिक हवाई अपघात दर खूप कमी आहे. जर एखाद्या देशात/क्षेत्रात पुरेशी पायाभूत सुविधा- विमानतळ, नेव्हिगेशन, हवामान प्रणाली, कुशल वैमानिक आणि क्रू, तसेच कडक नियमन असेल तर छोट्या विमानांचा वापर सुरक्षितपणे वाढवता येतो. युरोप आणि अमेरिकेत छोट्या चार्टर आणि खाजगी विमानांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो व तिथे शेकडो लहान विमानतळ असून खाजगी अथवा वैयक्तिक उड्डाणे सामान्य गोष्ट आहे.
बारामतीत सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इतके धुके नसते. तर नेमके काय झाले असावे?
अशा अपघातांच्या संभाव्य कारणांमध्ये खराब दृश्यमानता, प्रतिकूल हवामानात वैमानिकाचा लँडिंग करण्याचा चुकीचा प्रयत्न, वैमानिकाचा अंदाज चुकणे, धावपट्टीच्या भागात अचानक क्रॉस विंडस वा प्रतिकूल हवामान तयार होणे, नियंत्रणातील त्रुटी, यांत्रिक बिघाड किंवा क्रू फटिग अशा व इतर कारणांचा समावेश असू शकतो. तरीही, हे केवळ प्राथमिक निरीक्षणे आणि विविध माध्यमातून उपलब्ध माहितीवर आधारित आहेत. अपघाताचे खरे कारण हे एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्या स्वतंत्र चौकशीतूनच निश्चित होईल. ब्लॅक बॉक्स, साक्षीदार विधाने, विमान अवशेष, तांत्रिक विश्लेषणावर आधारित अधिकृत अंतिम अहवाल येईपर्यंत कोणतेही अनुमान किंवा दोषारोपण टाळावयास हवे. असे अनुमान व शंका-कुशंका चुकीची माहिती पसरवू शकतात, पीडित कुटुंबीयांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि चौकशी प्रक्रियेत अडथळे देखील आणू शकतात.
राजकीय नेत्यांनी आपल्या विमान वापरावर बंधन आणावे का?
कशासाठी व का असे करावे? असे बंधन आणणे योग्य किंवा शक्य नाही. प्रत्येक व्यक्तीला,-मग तो नेता असो वा सामान्य नागरिक असो, आपली गरज, सुरक्षा आणि आर्थिक क्षमतेनुसार आपल्या पसंतीचे वाहतुकीचे साधन निवडण्याचा अधिकार आहे. भारतात नागरी हवाई वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा प्रोटोकॉल सर्वांसाठी समान लागू होतात. खाजगी/चार्टर विमान वापर हा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यावर अतिरिक्त बंधन घालणे वैयक्तिक अधिकार अथवा व्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्न निर्माण करू शकेल. त्याऐवजी, हवाई वाहतुकीची सुरक्षितता वाढवण्यासाठी नियमन, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे जास्त उपयुक्त ठरेल.
