Plane Crash | बारामतीच्या धक्क्यानंतर आणखी एक हादरा; कोलंबियात विमान अपघात, खासदारासह 15 जणांचा मृत्यू
कोलंबिया : Plane Crash | महाराष्ट्रात बारामती येथे घडलेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच जगभरात विमान अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात बुधवारी एक भीषण विमान अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका खासदाराचाही समावेश असल्याने ही घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे.
कोलंबियाच्या नॉर्ते दे सांतांदेर प्रांतातील ग्रामीण भागात हे छोटे प्रवासी विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिकांसह १३ प्रवासी प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की विमानातील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. मृतांमध्ये कटाटुम्बो परिसराचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डायोजेनेस क्विंतेरो यांचा समावेश आहे. ते मानवाधिकार आणि कायदेशीर सुधारणांच्या क्षेत्रात सक्रिय कार्यासाठी ओळखले जात होते.
अपघातानंतर कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अधिकृत तपासानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जगभरातील या दुर्घटनांनी हवाई सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
