Pune Crime News | केअर टेकरने वृद्ध मेजरचे धनादेश चोरुन 1 कोटी 11 लाख रुपयांना घातला गंडा; लष्कर पोलिसांनी एकाला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मुलबाळ कोणी नसलेल्याने काळजी घेण्यासाठी निवृत्त मेजर यांनी एक केअर टेकर नेमला. ते वृृद्धाश्रमात रहायला गेल्यानंतर केअर टेकरने इतरांची मदत घेऊन त्यांचे धनादेश चोरुन तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण लक्षात येताच लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत मेजर बोमन इरुशॉ अमारिया (वय ८७, रा. पुण्यधाम वृद्धाश्रम, कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुप्रितसिंग भुपेंद्र कंडारिया Supritsingh Bhupendra Kandaria (वय ३९, रा. माधव सोसायटी, कोथरुड) याला अटक केली आहे. केअर टेकर राज शहा व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२५ पासून आजपर्यंत बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर बोमन अमारिया यांना मुलबाळ अथवा वारसदार नाही. ते एकटेच असल्याने त्यांनी राज शहा याला केअर टेकर नेमले होते. काही काळाने ते वृद्धाश्रमात राहायला गेले. त्यांच्या बँक खात्यात पेन्शन जमा होत होती. ते वृद्धाश्रमात गेल्यानंतर केअर टेकर राज शहा याने सुप्रितसिंग कंडारिया व इतरांच्या मदतीने त्यांच्या बँक खात्याचे धनादेश चोरले. त्यावर बनावट सही करुन वेळोवेळी १ कोटी ११ लाख ९३ हजार ९०० रुपयांची रक्कम काढली. बँक खात्यातील पैसे कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी याबाबत माहिती घेऊन बँकेतून रक्कम काढणार्‍या सुप्रितसिंग कंडारिया याला अटक केली आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

You may have missed