Pune PMC News | हवेचे प्रदूषण करण्यासाठी बेकरी, हॉटेल व्यावसायीकांना लाकूड, कोळसा वापरण्यास बंदी; बेकरी, हॉटेल व्यावसायिकांनी हरित इंधनाचा वापर करण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश
पुणे : Pune PMC News | हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी शहरातील बेकरी, हॉटेल्स, ढाबा, रेस्टॉरंट चालकांनी यापुढे भट्टया अथवा तंदूरसाठी लाकूड, कोळश्याऐवजी एलपीजी, पीएनजी अथवा विद्युत या हरित इंधनाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. तपासणीदरम्यान लाकूड, कोळश्यासारख्या पारंपारीक इंधनाचा वापर केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे श्वसनाच्या आजारात वाढ होत चालली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. याचाच एक भाग म्हणून लाकूड, कोळसा, गोवर्या या सारख्या पारंपारिक धूर निर्माण करणार्या इंधनावर मर्यादा आणण्यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. बेकरी व्यवसायामध्ये भट्टयांसाठी सर्रास लाकूड, कोळसा या सारख्या जळाउ पदार्थाचा वापर करण्यात येतो. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर तंदूरसाठी देखिल हेच इंधन वापरण्यात येते. याऐवजी बेकरी, हॉटेल्स, ढाबेचालकांनी एलपीजी, पीएनजी गॅस अथवा विद्युत इंधनाचा वापर करावा. तपासणी दरम्यान लाकूड, कोळश्यासारख्या पारंपारिक इंधनाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
शहरात विविध भागामध्ये मोठ्याप्रमाणावर बेकरी व्यवसाय करण्यात येतो. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंटची संख्या देखिल काही हजारांमध्ये आहे. या ठिकाणी तंदूर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर लाकूड अथवा कोळश्याचा वापर करण्यात येतो. महापालिकेच्या आदेशामुळे या व्यवसायामध्ये यापुढे हरित इंधन वापराचे बंधन आल्याने व्यावसायीक काय निर्णय घेतात? याबाबत उत्कंठा वाढली आहे.
