Pune Crime News | जुन्या वादातून युवकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | जुन्या वादातून युवकावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कात्रजमधील संतोषनगर येथील शनि मंदिराजवळील दिग्विजय चौकात गुरुवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
या घटनेत अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. अंजनीनगर, गणपती मंदिराजवळ, कात्रज) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत त्यांचे वडिल अब्दुल रहिम नदाफ (वय ४५, रा.बिलाल आशियाना, अंजनीनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी काही युवकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ हा ए सी दुरुस्तीचे काम करतो. त्याची आर्यन, यश, शुभम व इतर मुलांबरोबर यापूर्वी किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन या मुलांनी अजमल नदाफ याला शनि मंदिराजवळील दिग्विजय चौकात अडविले. त्याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आंबेगाव पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी अधिक तपास करीत आहेत.
