Sushma Andhare | ‘धुकं होतं तर सीसीटीव्हीत विमान स्पष्ट कसं?’ अजित पवार विमान अपघातावर सुषमा अंधारे यांचा सवाल
मुंबई : Sushma Andhare | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघातानंतर अपघाताच्या कारणांवरून राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात थेट शंका उपस्थित केली आहे. अपघाताच्या वेळी बारामती परिसरात दाट धुकं असल्याचा दावा केला जात असताना, सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे दिसत असल्याने हा दावा संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, जर अपघाताच्या वेळी दाट धुकं होतं, तर दूरवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विमान इतकं स्पष्ट कसं दिसतं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धुक्यालाच अपघाताचं कारण सांगितलं जात असताना या फुटेजकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या प्रकरणात केवळ प्राथमिक कारणे सांगून समाधान मानू नये, तर सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे विधान नमूद करत त्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. धुक्यामुळे अपघात झाला असे सांगितले जात असताना, प्रत्यक्ष पुरावे वेगळे चित्र दाखवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या गंभीर घटनेवर राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांचे मौन का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हा अपघात अत्यंत गंभीर असून केवळ अंदाजांवर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अपघातामागील सर्व बाबी, तांत्रिक कारणे आणि परिस्थिती जनतेसमोर स्पष्ट व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
