Pune Crime News | एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या बाचाबाचीत खाली पडून तरुणाचा मृत्यु; भारती विद्यापीठ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाखाली एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | पहाटेच्या सुमारास अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले असताना तेथे एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या बाचाबाचीत ३ ते ४ जणांनी तरुणाला मारहाण केली. त्यात खाली पडल्याने तरुणाच्या डोक्याला मार लागला. रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यु झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाच्या मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
सौरभ संजय शिखरे (वय २८, रा. लुमिनार हाईट्स, लिपाणे वस्ती, आंबेगाव, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तेजस विकास सणस Tejas Vikas Sanas (वय १९, रा. आंबेगाव, कात्रज) याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्ष्रक भोजलिंग दोडमिसे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ शिखरे हे २४ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता घराजवळील रसवंतीगृहासमोर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांच्यावर नर्हे येथील सिल्व्हर बर्च हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना २८ डिसेंबर २०२५ रोजी सौरभ शिखरे यांचा मृत्यु झाला होता. या अकस्मात मृत्युचा सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत होते. याबाबत माहिती घेतल्यावर बालाजी रमेश कर्डीले व समीर धनाजी कुडले यांनी सांगितले की, ते व सौरभ शिखरे हे मिळून गाडीवर बाहेर फिरत होते.
अंडाभुर्जी खाण्यासाठी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते भारती विद्यापीठाच्या मागील गेटजवळील नादब्रम्ह इडली समोरील अंडा भुर्जीच्या गाडीवर गेले. तेथे त्यांच्या ओळखीचा तेजस सणस व त्यांच्या मित्रांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याने त्यांनी शिवीगाळ केली. बालाजी कर्डीले याला हाताने मारहाण झाल्यावर तो पळून गेला. त्यानंतर तेजस व त्याच्या मित्रांनी सौरभ शिखरे याला मारहाण केली. मारहाणीच्या दरम्यान तो खाली पडला. त्यानंतर समीर कुडले याने रिक्षामधून त्याला तो रहात असलेल्या बिल्डिंगच्या गेटजवळ आणून सोडले व तो घरी गेला, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये सौरभ शिखरे याच्या डोक्याच्या उजव्या बाजुस अंतर्गत मार लागल्याचे स्पष्ट झाले. तसेच सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीवरुन तेजस सणस व त्याच्या मित्रांच्या मारहाणीतील सौरभ शिखरे हा खाली पडून त्याच्या डोक्यास मार लागला होता. त्यामुळे त्याचे डोक्यात अंर्तगत गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यु झाला. त्यावरुन पोलिसांनी तेजस सणस व त्याच्या मित्रांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तेजस सणस याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील तपास करीत आहेत.
