Pune Accident News | खराडीमध्ये पिकअप वाहनाच्या चाकाखाली सापडून 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यु
पुणे : Pune Accident News | दुध वाहतूक करणार्या पिकअप वाहनाच्या चाकाखाली सापडून २ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना खराडीमध्ये घडली आहे. खराडी पोलिसांनी पिकअपच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयूर अमर माळवे (वय २) असे मृत्यु पावलेल्या बालकाचे नाव आहे. पिकअप वाहनचालक राजू मगन ढोले पाटील (वय ६६, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले पाटील रोड, संगमवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पूनम अमर माळवे (वय २५, रा. ढोले पाटील वाडा, पंचशिल टॉवरचेजवळ, खराडी) यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना पंचशील टॉवरचेजवळील कपिला म्हशीचे गोठ्यासमोर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा दोन वर्षांचा मुलगा गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. मोकळ्या जागेत ढोले यांचा गोठा आहे. दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन ढोले तेथे आले होते. त्यांनी बाजूला मयुर खेळत आहे, हे न पाहता पिकअप वेगाने नेली. त्यात क्लिनर साईडचे डावे चाक मयुर याच्या अंगावरुन गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिकअप वाहनचालक ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.
