Pune Crime News | कौटुंबिक वादातून भावजयीच्या पायावर गरम पाण्याची बादली टाकून दीराने चापटी मारुन गालाचे हाड केले फ्रॅक्चर
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून भावजयीच्या पायावर गरम पाण्याची बादली ओतून तिला जखमी केले़ तिच्या गालावर जोरात चापटी मारल्या. त्यामुळे तिच्या डाव्या डोळ्याच्या खालचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
याबाबत प्रतिभा शरद पवार (वय ४५, रा. खाटपेवाडी, भुकुंम, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भरत निवृत्ती पवार (वय ५८, रा. खाटपेवाडी, भुकुंम, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खाटपेवाडी येथील त्यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिभा पवार यांचे आरोपी भरत पवार हे मोठे दीर आहेत. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरुन पाच दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. प्रतिभा पवार या सकाळी घरासमोर भांडी घासत होत्या. यावेळी त्यांचा मोठा दीर भरत पवार हा अंघोळीसाठी गरम पाण्याची बादली घेऊन आला. त्याने भांडणाचा राग मनात धरुन त्यांना शिवीगाळ करुन तुला माज आला आहे, तुला दाखवतोच, अशी धमकी देऊन हातातील गरम पाण्याची बादली त्यांच्या पायावर ओतली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांवर भाजले आहे. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या डाव्या गालावर जोरात दोन चापटी मारल्या. त्यामुळे फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याचे खालचे हाड हे हेअर लाईन फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
