Prashant Waghmare | महापालिकेच्या शहर अभियंता पदावरील प्रदीर्घ कालावधीनंतर प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त; शेकडो अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उपस्थितीत वाघमारे यांची सेवामुक्ती
पुणे : Prashant Waghmare | पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आज ३३ वर्षांच्या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. तब्बल बावीस वर्षांहून अधिक काळ शहर अभियंता पदावर काम करण्याचा तसा हा ऐतिहासिक विक्रम असून या कालावधीत शहरात उभे राहीलेले विविध स्वरुपाचे प्रकल्प आणि योजनांमध्ये वाघमारे यांचे मोठे योगदान राहीले आहे. महापालिकेच्या हजारांहून अधिक अभियंत्यांना प्रदीर्घ काळ सोबत घेउन यशस्वी नेतृत्वाच्या किमयेमुळे आज अखेरच्या दिवशी त्यांना सेवेतून निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतलेल्या प्रशांत वाघमारे यांनी१९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणमध्ये नोकरीला सुरूवात केली. १९९३ मध्ये ते ते महापालिकेत उपअभियंता पदावर रुजू झाले. सुरुवातीला पथ विभागात काम केल्यानंतर भवन रचना विभागात काम पाहीले. कोरेपार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडीयमचे नूतनीकरण, कमला नेहरू रुग्णालयाची विस्तारीत इमारत, अण्णाभाउ साठे नाट्यगृह, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, चिखलवाडी येथील हॉकी स्टेडीयम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, महापौरबंगला, महापालिका भवनची नवीन इमारतीसोबतच सध्या सुरु असलेल्या भिडे वाडा आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ाची इमारत उभारणीचे काम त्यांच्याच नेतृत्वात झाले.
सीवायजीच्या निमित्ताने शहरातील कॉंक्रीटचे रस्ते, बाणेर रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रीटीकरण, बालेवाडी येथील उड्डाणपुलाचे काम विक्रमी साठ दिवसांच्या कालावधीत करण्याचे श्रेय वाघमारे यांनाच जाते. वारजे, वडगाव आणि होळकर पूल येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, मुंढवा जॅकवेल, भामा आसखेड धरणातून पुणे शहराला २०० एमएलडी पाणी पुरवठ्याचा आव्हानात्मक प्रकल्प, समान पाणी पुरवठा प्रकल्प, नदी काठ सुधार प्रकल्प, जायका अंतर्गत एसटीपी उभारण्याच्या प्रकल्पांच्या कामांचे नेतृत्वही त्यांनी केले. आयटी उद्योगाला चालना देण्यासाठी गतीमान बांधकाम परवानग्यांसोबतच रस्ते, पदपथ अशा आवश्यक सुविधांवर भर देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कोरोनाच्या साथीत बाणेर येथे अवघ्या २१ दिवसांत तीनशे बेडस्ची दोन हॉस्पीटल उभारणीमध्ये वाघमारे यांचे नेतृत्व महत्वाचे ठरले. विशेष असे की महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प असताना सीएसआरच्या माध्यमांतून आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सीजन प्लांटसह ही दोन हॉस्पीटल उभारल्याने हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले. याच काळात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारातही अडथळे निर्माण होते. याचा विचार करून विक्रमी वेळेत विद्युत दाहिन्यांची संख्याही वाढविण्यावर त्यांनी भर दिला. जुन्या व नवीन हद्दीचे विकास आराखडे तयार करण्याचे कामही त्यांच्याच नेतृत्वात झाले. देवाची उरूळी आणि फुरसुंगी येथील चार टीपी स्किमची कामे शेवटापर्यंत नेणे, विकासासाठी भूसंपादनात येणार्या अडचणींवर त्यांनी जागा मालकांसोबत यशस्वी बोलणी करत महापालिकेला थेट आर्थिक तोषिस न लावता अनेक जागा ताब्यात घेण्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याने अनेक नागरी प्रकल पूर्णत्वास जावू शकले.
प्रकल्पांची कामे करत असताना प्रशासनाला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. बांधकामसह सर्वच विभागांचे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्याने कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली. स्वत: सातत्याने नव्याचा ध्यास ठेवत अभियंत्यांच्या भावी पिढीला तंत्रज्ञानाची कास धरून विकासाची दिशा दाखविण्यासाठी वाघमारे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ई गर्व्हनन्समध्ये पुणे महापालिका देशपातळीवर सातत्याने अग्रक्रमी राहीली. त्यांच्या याच कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवणारे शेकडो अधिकारी आणि कर्मचारी वाघमारे यांना निरोप देण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत जमले होते. वाघमारे प्रत्यक्षात शनविारी ३१ जानेवारी रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र, शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने तांत्रिकदृष्टया आजच त्यांनी महापालिकेतील कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या जागेवर अनिरुद्ध पावसकर यांची शहर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
