MLA Rohit Pawar | पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांनी उठवले अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही मोठा खुलासा

MLA Rohit Pawar | Will the Pawar family reunite? Rohit Pawar raises questions about Ajit Pawar's plane crash, also makes a big disclosure on the merger of NCP

बारामती :   MLA Rohit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य करून सर्वांनाच थक्क केले. त्यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत उभ्या राहिलेल्या शंका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या मागील राजकीय प्रक्रियेवर मोठा खुलासा केला. या सर्व बाबींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

रोहित पवार यांनी मतदारसंघात मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांची इच्छा होती की कुटुंब एकत्र राहावे. अजित पवार यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र परिवार म्हणून ते सुनेत्रा पवार यांना अजित पवारांप्रमाणेच पाहतात. उपमुख्यमंत्री पद, तसेच अजित पवारांकडे असलेली सर्व खाती सुनेत्रा पवार यांना मिळावीत, अशी मनापासून इच्छा होती. पुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा पदावर सुनेत्रा पवार यांचा विचार व्हावा, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, दु:खद घटनेनंतर दहा दिवसांपर्यंत कुटुंबीय एकत्र होते. काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा एकत्र मतदानासाठी येणारा प्रसंग याचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवार यांनीही कुटुंबाला भावनिक आधार दिला असून, त्यांच्याबरोबर काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

रोहित पवारांनी अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, १० फेब्रुवारी रोजी ते या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन संशयास्पद बाबी उघड करणार आहेत. तसेच, १२ फेब्रुवारीला मुंबईत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा मागील राजकीय वाटाघाटीचा सविस्तर खुलासा रोहित पवार करणार आहेत. विलीनीकरणासाठी काय प्रयत्न झाले, अजित पवारांनी कोणती भूमिका घेतली याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर लगेच राजकीय चर्चा होऊ शकली नाही, कारण कुटुंबीय धक्क्यात होते, पण आता पुढील धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. ९ फेब्रुवारीनंतर या प्रकरणात मोठे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

You may have missed