Maharashtra Weather Alert | फेब्रुवारीतच मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, पावसाची चिन्हे नाहीत, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?

Maharashtra Weather Alert

मुंबई :  Maharashtra Weather Alert | हिवाळ्याचा शेवट अजून व्हायचा असताना राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर एप्रिल महिन्यासारखी उष्णता जाणवत असून, तापमानाने सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्ण व कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, ते सरासरीपेक्षा सुमारे ४ अंशांनी जास्त आहे. किमान तापमानातही जवळपास ३ अंशांची वाढ नोंदली गेली आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात जाणवणारी उष्णता यंदा महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागल्याने वातावरणात अचानक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सकाळपासूनच उन्हाची झळ बसू लागते आणि दुपारपर्यंत उकाडा वाढतो, त्यामुळे घामाघूम होणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याची अनुभूती येत आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता असल्याने उष्णतेची तीव्रता किंचित कमी जाणवू शकते, मात्र तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी आहे. थंडी पुन्हा परतण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. त्यामुळे फेब्रुवारीतच उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्याच्या इतर भागांमध्येही कोरडे हवामान राहणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसा तापमान वाढत राहील, तर काही भागांत रात्री सौम्य गारवा टिकू शकतो. उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असला तरी त्याचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नाही.

१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत देशात सरासरीपेक्षा सुमारे ३४ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण फेब्रुवारी महिना नेहमीपेक्षा अधिक उष्ण व कोरडा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे, भरपूर पाणी पिणे आणि हलके सुती कपडे वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एकूणच, हिवाळा संपण्याआधीच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने राज्यात यंदाचा उष्ण हंगाम लवकर सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

You may have missed