Maharashtra Weather | फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल; महाराष्ट्रात उकाडा वाढला, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई : Maharashtra Weather | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. राज्यभर कोरडे आणि उष्ण हवामान पसरू लागले असून, सकाळी गारवा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा अशी बदलती परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस तापमान वाढतच राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहणार असून, पावसाची शक्यता नाही. मात्र उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीत उष्ण-दमट वातावरण जाणवणार आहे. येथे कमाल तापमान सुमारे 34 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 23 अंशांच्या आसपास राहणार आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवेल. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सलग चौथ्या दिवशी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलका गारवा जाणवेल; मात्र दुपारनंतर तापमान 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पुन्हा थोडी थंडावा परतेल, पण दिवसाचा मोठा भाग उष्ण राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र सर्वाधिक उष्णतेचा तडाखा बसणार असून तापमान अनुक्रमे 37 ते 38 आणि 38 ते 39 अंशांपर्यंत पोहोचू शकते.
हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या उन्हात अनावश्यक बाहेर पडू नये, पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे, अशी सूचना केली आहे. सध्या पावसाची कोणतीही शक्यता नसून पुढील काही दिवस महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहणार आहे. एकंदरीत, फेब्रुवारी संपायच्या आधीच उन्हाळ्याने जोर धरल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.
