Maharashtra Weather | राज्यात उन्हाचा पारा चढला; कोकण ते विदर्भ उकाड्याचा इशारा, पावसाची चिन्हे नाहीत

Maharashtra Weather

मुंबई : Maharashtra Weather | फेब्रुवारी संपायच्या आधीच महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण कोरडे आणि उष्ण होत असून १७ फेब्रुवारीपासून तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बहुतांश भागात आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी थोडा गारवा जाणवला तरी दुपारपर्यंत उन्हाचा चटका तीव्र होणार आहे.

कोकण किनारपट्टी भागात दमट उकाडा वाढणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास जाणवेल. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलकी थंडी जाणवेल; मात्र दुपारपर्यंत तापमान झपाट्याने वाढेल. येथे कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचू शकते. संध्याकाळी थोडा दिलासा मिळेल, पण दिवसभर उकाडा कायम राहील.

मराठवाड्यात कोरडे हवामान राहणार असून कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नसल्याने ऊन अधिक कडक जाणवणार आहे.

विदर्भात सर्वाधिक उष्णतेची नोंद होणार आहे. येथे कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असून दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एकंदरीत राज्यातून थंडी माघारी फिरली असून, उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस दुपारच्या वेळेत बाहेर पडताना डोके झाकणे, पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.