Rajya Sabha Election 2026 | राज्यसभा निवडणूक रंगात; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी, भाजपमध्येही नावांवर खलबतं
मुंबई : Rajya Sabha Election 2026 | आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कडून पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही बैठक प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीतच पार्थ पवार यांच्या उमेदवारीला अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे इतर सदस्यही उपस्थित होते.
याच बैठकीत २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या तयारीवरही चर्चा करण्यात आल्याचे समजते. येत्या काही दिवसांत वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष (BJP) कडूनही राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या रिंगणात चार उमेदवार उतरवले जाणार असल्याची माहिती आहे. त्यापैकी एका जागेसाठी रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित तीन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याचे समजते.
एकूणच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून रणनीती आखली जात असून, पुढील काही दिवसांत उमेदवारीच्या घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
