Maharashtra Weather Alert | मार्चमध्येच उष्णतेचा तडाखा; महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather

मुंबई :  Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १० मार्च रोजी राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोकण आणि मुंबई परिसरात उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अधिक परिणाम जाणवू शकतो. या भागांत तापमान ३७ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर परिसरात ऊन वाढले आहे. कमाल तापमान ३५-३९ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान १८-२२ अंशांवरच असेल. उष्ण आणि कोरडे हवामान असल्याने उकाडा जाणवेल. पावसाची शक्यता नाही.

उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके सुती कपडे वापरावेत आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

You may have missed