Pune Crime News | पुण्यात गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास; पीएमपी, एसटी प्रवासी आणि गणेशभक्त महिलांना चोरट्यांचा फटका

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  शहरात गर्दीचा फायदा घेत प्रवासी आणि गणेशोत्सवासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे दागिने व रोकड चोरण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पीएमपी आणि एसटी प्रवाशांसह गणेशोत्सवातील गर्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे आणि इतर दागिने चोरट्यांनी लांबविले. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेची दोन लाखांची बांगडी चोरी

पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील सुमारे दोन लाख दहा हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली.

ही महिला कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात राहते. 12 सप्टेंबर रोजी त्या पीएमपी बसमधून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कटरचा वापर करून त्यांच्या हातातील बांगडी कापून लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दागिने आणि रोकड असा सुमारे 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लंपास

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे 70 हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने लांबविली.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मुंबईतील कुर्ला परिसरात राहतात. 16 सप्टेंबर रोजी ते एसटी बसमधून प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

गणेशोत्सवाच्या गर्दीत महिलांच्या मंगळसूत्रांवर डल्ला

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कसबा पेठ आणि शनिपार परिसरातील घटनांप्रकरणी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील 15 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. संबंधित महिला पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहते. 18 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास त्या जिजामाता चौकातील नवग्रह मंडळाजवळून जात असताना ही घटना घडली. पोलीस हवालदार अजिज शेख तपास करत आहेत.

सदाशिव पेठेतील शनिपार मंडळ परिसरात दोन स्वतंत्र घटनांमध्ये आणखी दोन महिलांचे दागिने चोरीला गेले.

19 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले. याप्रकरणी महिलेच्या पतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.

त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शनिपार परिसरात धनकवडीतील एका महिलेच्या गळ्यातील 15 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.

गणेशोत्सवातील गर्दीच्या भागांत महिलांचे दागिने, रोकड आणि मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

You may have missed