Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये घुमला देवाधिदेव महादेवांचा जयजयकार ! नमामि शंभो कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवली सूरमय शिवभक्ती संध्या

Pune Festival 2026 | Cheers hailing Lord Mahadev resonated at the Pune Festival! Through the 'Namami Shambho' program, the audience experienced a melodious evening of devotion to Lord Shiva.

पुणे : Pune Festival 2026 |  देवाधिदेव महादेवांच्या सामर्थ्याचे, महानतेचे वर्णन करणाऱ्या आगळ्यावेगळ्या भक्ती व स्तुतीपर रचनांची एक भावभक्तीपूर्ण अशी मैफिल रसिकांनी बुधवारी सायंकाळी अनुभवली. कंठसंगीतासह भारतीय पारंपरिक वाद्यांचा मेळही या मैफिलीची रंगत द्विगुणित करणारा ठरला.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बुधवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नमामि शंभो हा कार्यक्रम सादर झाला. प. पू. दिघे मावशी तसेच संजीव दिघे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो, या नांदीने सुरू झालेली शिव आराधना थेट बिल्वाष्टकापर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवणारी होती. देवाधिदेव महादेवाचा महिमा वर्णन करण्यासाठी या अनोख्या कार्यक्रमाची रचना झाली आहे. शिव महादेवाचे माहात्म्य, श्रेष्ठत्व वर्णन करणाऱ्या विविध भक्तीरसपूर्ण रचना हे नमामि शंभो कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत गीत, श्लोक, परण, स्तोत्ररचना, नाट्यपद, नांदी, चित्रपटगीत…असे वैविध्य त्यात होते, त्याचप्रमाणे शंख, पखवाज, तबला, बासरी, डमरू…अशा वाद्यांमुळे तालपक्षही समृद्ध झाला होता. कार्यक्रमाची प्रेरणा प. पू. दिघे मावशी यांची तर संकल्पना संजीव दिघे यांची होती. शेखर केंदळे, चंदाराणी केंदळे, अश्विनी औसेकर, मनीष तुपे, सुमित जाधव या गायक कलाकारांनी अतिशय तन्मयतेने या शिवस्तुतीपर रचना सादर केल्या. त्यांना प्रतीक गुजर (पखवाज), अनिल भुजबळ (तबला), ऋतिक गुजर (तालवाद्ये), शैलेश देशपांडे (बासरी),  प्रकाश सुतार (की बोर्ड) या वादकांनी समरसून आणि गीताची रंगत खुलवणारी साथ केली. हर्षल भंडारे यांनी निवेदन केले.

शिवस्तुतीपर अशा नांदीसोबत कर्पूरगौरम्, षड्ज शिव है ही शिवमहिमास्तुती, आदीदेव महादेव, शिवरक्षास्तोत्र, लिंगाष्टकम्, शिव कैलासो के वासी, शिवस्वर्णमाला, सदाशिवअष्टकम्, शंभो शंकरा, पार्वती वल्लभाष्टकम् मनो भूतनाथं नमो देवदेवं, रुद्राष्टकम्, शंकराभरणम्, नमामि शंभो, सत्यं शिवं सुंदरम् हे गीत, सोहं हर डमरू बाजे हे नाट्यपद,  पू. पू. मावशी यांची प्रार्थना, शिवतांडवस्तोत्र, आणि बिल्वाष्टकम्…अशा रचनांच्या प्रभावी सादरीकरणामुळे वातावरण शिवभक्तीने भारावून गेले. परण, स्तोत्रगायनाला पारंपरिक भारतीय वाद्यांची दमदार साथ मिळाल्याने या रचना अधिकच श्रवणीय झाल्या. शिव आणि गणेश परण या रचना पखवाजसाथीमुळे दाद मिळवणार्या ठरल्या. मुख्य म्हणजे नित्य परिचित रचनांपेक्षा वेगळ्या रचनांचा समावेश असल्याने नवेपणा, वेगळेपणा आणि वैविध्य, असा त्रिवेणी संगम जमून आला होता.

प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डाॅ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांच्या हस्ते कार्यक्रमातील गायक, कलाकार, वादक, निवेदक, संयोजकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संयोजन समितीचे अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे, सचिन आडेकर, नामदेव आदी उपस्थित होते.

You may have missed