Pune Ganesh Visarjan Miravnuk | विसर्जन मिरवणुक मार्गावर 27 रुग्णवाहिका सज्ज ! 750 वाहतूक पोलिसांना दिले सीपीआरचे प्रशिक्षण
पुणे : Pune Ganesh Visarjan Miravnuk | विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना काही त्रास झाल्यास त्यांच्या मदतीला चारही विसर्जन मार्गावर २७ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत एक वाहतूक शाखेचा पोलीस अंमलदार असणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी लाखो भाविक येतात. तसेच विसर्जन मिरवणुकीमुळे जवळपास ३६ तास परिसरातील रस्ते बंद असतात़ अशा वेळी तेथील स्थानिक रहिवाशांना काही त्रास झाला. त्यांना अचानक हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आल्यास कोणती सुविधा आहे, असे विचारता पोलीस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी सांगितले की, चारही विसर्जन मिरवणुक मार्गावर २७ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. त्यात आवश्यक सोयीसुविधा असून प्रत्येक रुग्णवाहिकेबरोबर वाहतूक पोलीस ठेवण्यात आला आहे. कोणाला त्रास झाला व त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली तर, रुग्णवाहिकेबरोबर असलेला वाहतूक शाखेचा पोलीस अंमलदार पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून या गर्दीतून वाट काढून रुग्णाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहचवतील. अशा वेळी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाची संपर्क साधावा, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्यात येईल.
विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणाला त्रास झाला. अचानक श्वास घेण्यास अडचणी आल्या तर, त्यांना मदत करण्यासाठी तसेच जागेवरच सीपीआर देण्यासाठी वाहतूक शाखेचे ७५९ पोलीस अंमलदार व अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे पोलीस अंमलदार संपूर्ण विसर्जन मार्गावर कार्यरत राहणार आहेत. कोणाला गरज वाटली तर तातडीने ते आवश्यक ती मदत करतील, असे डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी सांगितले.
