Pune Crime News | पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करुन मुलींना ड्रग्ज विक्री केल्याचे सांगून तरुणाला लुबाडले;  भामट्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पुण्यात नोकरीसाठी आलेल्या तरुणाला एकाने गुडगाव येथील पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करुन तू मुलींना ड्रग्ज विक्री करतो, अशी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे लुबाडले. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी खंडणीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शिखर कुमारगौरव सक्सेना (वय २२, रा. पी जी, खराडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील कुमारगौरव सुधीरकुमार सक्सेना (वय ४६, रा. हरिद्वार, उत्तराखंड) यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजयकुमार भाटीया व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खराडी येथील रिव्हरडेल सुट या सोसायटीमध्ये २९ सप्टेंबर व १ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शिखर सक्सेना याने बी टेकचे शिक्षण घेतले होते. त्याला मगरपट्टा येथील अ‍ॅसेंचर कंपनीमध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे तो २७ जुलै २०२६ रोजी पुण्यात आला. खराडी येथील अवश्या पी जीमध्ये तो राहू लागला. ३० सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या पत्नीला फोन आला. फोन करणार्‍याने रागात पत्नीला विचारले की,  शिखर कुठे आहे. माझे त्याच्याशी बोलणे करा. त्यावेळी पत्नी वंदना घाबरली. तिने शिखर पुण्याला असतो, असे सांगितल्याने समोरच्याने फोन कट केला. त्यांनी true caller ट्रु कॉलरवर चेक केल्यावर त्यावर अजयकुमार भाटीया असे नाव आले . त्यांनी त्या नंबरवर फोन लावल्यावर त्याने मी शिखरचा मित्र आहे. मला त्याच्याकडून पीडीएफ पाहिजे होते, म्हणून फोन केल्याचे सांगितले.

शिखर याला फोन केल्यावर तो फिर्यादीची पत्नी वंदना हिच्या मोबाईलवर फॉरवर्ड होत होते. अजयकुमार भाटिया याने पुन्हा फोन केला. तेव्हा त्याने माझी व शिखर याची ऑनलाईन पबजी गेम खेळताना ओळख झाली, असे सांगितले. फिर्यादी यांनी शिखर पबजी खेळत नसल्याचे सांगितल्यावर तो गडबडून गेला. त्याने फोन कट केला. त्यावेळी आदित्य वर्मा याचा फोन आला. त्याने शिखरचा नंबर मागितला. शिखर याचा फोन बंद असल्याने फिर्यादी यांनी त्याचे मामा अभिषेक सक्सेना त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यांना शिखर राहतो, तेथे जाऊन चौकशी करायला सांगितले. पी जी चालकाने तो सायंकाळी साडेपाच वाजता बाहेर गेला असून त्याची रुम उघडी असल्याचे सांगितले. शिखरची काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा अजयकुमार भाटिया याला फोन करुन चौकशी केली.

तेव्हा त्याने मी सेक्टर २९ गुडगाव, हरियाणा येथे सब इन्स्पेक्टर आहे. तुमचा मुलगा शिखर हा पुण्यात मुलींना ड्रग्ज पुरवित/ विक्री करीत आहे, अशी तक्रार आली आहे. त्यावर फिर्यादी यांनी तुम्ही मुलाला काय धमकी दिली़ असे विचारल्यावर त्याने फोन कट केला. त्यानंतर त्याने पुन्हा फोन करुन तुमचा मुलगा ड्रग्ज विक्री करीत आहे, म्हणून अटक करणार आहोत, परंतु, तो आमचा फोन उचलत नाही, आमच्याशी संपर्क करीत नाही, मला त्याचा चालू नंबर दे, असे धमकावुन सांगितले. मुलाबाबत काहीतरी घडत आहे, असे वाटल्याने ते पुण्याकडे येण्यास निघाले. दरम्यान शिखरचा मामा अभिषेक सक्सेना यांनी शिखर हरविल्याची तक्रार खराडी पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, १ ऑक्टोंबर रोजी पहाटे साडेसहा वाजता खराडी येथील रिव्हरडेल सुट या सोसायटीचे इमारतीवरुन शिखर याने उडी मारुन आत्महत्या केली. शिखरवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी त्याचा लॅपटॉप उघडून पाहिल्यावर त्याने लॅपटॉपवर २९ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केल्याचे दिसून आले. शिखर याने वेगवेगळ्या अकाऊंट नंबरवर पैसे पाठविल्याचे व त्याचे स्क्रीन शॉट हे अजयकुमार भाटीया याला पाठविल्याचे दिसून आले. तसेच काही संशयित चॅटींग मिळून आले. त्यानंतर १३ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. कुरीयर ऑफीसमधून बोलत असून शिखर कुठे आहे, त्याचे कुरीयर तो परत का पाठवितो, असे विचारले. त्यावर त्यांनी कोणते कुरीयर, आपण कोण बोलताय, असे विचारल्यावर त्याने फोन कट केला. अजयकुमार भाटीया हा वेगळ्या फोन वरुन फोन करुन मुलाबाबत माहिती घेत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, अजयकुमार भाटीया याच्या त्रासामुळे शिखर सक्सेना याने आत्महत्या केल्याचे म्हणणे आहे. शिखर याने या काळात अनेकांना पैसे पाठविले आहेत. त्याच्या  बँक खात्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच भाटीया याचा शोध घेत आहोत.

You may have missed