Pune Accident News | पुणे : सातारा रोडवरील शंकर महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; चालकाला अटक
पुणे : Pune Accident News | सातारा रोडवरील शंकर महाराज मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरून परतणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री पुण्यातील बालाजीनगर परिसरात घडली.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मयूर मनीष होनकळसे (वय २६, रा. बालाजीनगर, मूळ रा. सातारा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा शंकर महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर तो दुचाकीवरून निघाला असता भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मयूरचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत टेम्पोचालक विवेकानंद भगत (वय २३, रा. चाकण) याला अटक केली आहे.
तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
