Ahilyanagar Crime | महाराष्ट्र हादरला! वारकरी संप्रदायाला काळिमा; कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अहिल्यानगर : Ahilyanagar Crime | अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून एका नराधम किर्तनकाराने अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित मुलगी अवघ्या १० वर्षांची असल्यापासून हा नराधम तिच्यावर अत्याचार करत होता. तब्बल पाच वर्षे सुरू असलेल्या अत्याचारानंतर अखेर या प्रकरणाला वाचा फुटली असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात घडली.
दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ Yashwant Eknath Thorat alias Annasaheb Gunjal (महाराज) (वय ३८) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी परिसरात किर्तनकार म्हणून ओळखला जातो. समाजात आदराचे स्थान असलेल्या या व्यक्तीने स्वतःच्या पदाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी लहान असल्याचा फायदा घेत त्याने तिला धमकावून ठेवले होते, ज्यामुळे भीतीपोटी ती इतकी वर्षे शांत राहिली. मात्र, अत्याचाराचा हा सिलसिला थांबत नसल्याने पीडितेने अखेर धीर एकवटून आपल्या घरच्यांना सर्व आपबिती सांगितली.
पीडितेच्या कुटुंबाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. धर्माच्या नावाखाली अशा प्रकारचे पाशवी कृत्य करणाऱ्या या किर्तनकारावर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात असून, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
