Aishwarya Surendra Pathare | महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर ! सखी प्रेरणा मंचाचा स्तुत्य उपक्रम; नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे म्हणाल्या – “महिलांनी आपल्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक“
पुणे: Aishwarya Surendra Pathare | महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात आलेल्या सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. चंदननगर येथील भाजी मंडई येथे आयोजित शिबिराला विविध वयोगटातील ५५० महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे १३,५०० रुपयांच्या तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या.
शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू, काचबिंदू व मोफत चष्मे वाटप), दातांची तपासणी (दातांची सफाई, सिमेंट भरणे व पॉलिश) तसेच स्तन कर्करोग तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या पार पडल्या. ‘निरोगी महिला म्हणजे सशक्त कुटुंब व सक्षम समाज’ या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
सखी प्रेरणा मंचाच्या संस्थापक अध्यक्षा तसेच नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे म्हणाल्या, “महिलांनी आपल्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शिबिरांमुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते. निरोगी महिला हीच सशक्त समाजाची खरी ताकद आहे. सखी प्रेरणा मंच महिलांसाठी कायम कार्यरत आहे आणि पुढेही महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना सातत्याने चालना दिली जाईल.”
दरम्यान, शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनी सखी प्रेरणा मंचाचे आभार व्यक्त करत “या शिबिराचा आम्हाला मोठा फायदा झाला. महाग असणाऱ्या विविध तपासण्या मोफत उपलब्ध झाल्या आणि त्या नियोजनबद्ध पद्धतीने करता आल्या,” अशा भावना व्यक्त केल्या. शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
