Aishwarya Surendra Pathare | पूर्व पुण्यातून उच्चशिक्षित दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात
पुणे : Aishwarya Surendra Pathare | पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित दाम्पत्य पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, दोघेही भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक ३, तर सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक ४ मधून मतदारांसमोर उभे राहिले आहेत.
सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित अभियंता असून पुण्यातील प्रतिष्ठित COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) येथून गोल्ड मेडलिस्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर पूर्व पुण्यात भाजप संघटना अधिक मजबूत झाल्याची चर्चा असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम देवेंद्र’ला अभ्यासू, तरुण आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे. सुरेंद्र पठारे यांच्या माध्यमातून पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या पठारे यांनीही प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवत आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्या उच्चशिक्षित उद्योजिका असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार (२०१४) आणि फायनान्शियल टाइम्स बिझनेस अवॉर्ड (२०२२) अशा सन्मानांनी त्या गौरवण्यात आल्या आहेत. ‘सखी प्रेरणा मंच’ या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास, स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर केंद्रित अनेक उपक्रम राबवले आहेत.
वडगाव शेरीतील हजारो महिलांना एकत्र आणत त्यांनी जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. हा उपक्रम धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला असून परिसरात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. महिलांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमामुळे ऐश्वर्या पठारे यांची ओळख प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या आणि नेतृत्व म्हणून अधिक ठळक झाली आहे.
एकीकडे तांत्रिक व अभ्यासू पार्श्वभूमी असलेले सुरेंद्र पठारे आणि दुसरीकडे सामाजिक जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन असलेल्या ऐश्वर्या पठारे या दाम्पत्यामुळे पूर्व पुण्यातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून मतदार त्यांच्याकडे कसे पाहतात, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
