Ajit Pawar | …तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या टीकेवर अजित पवार संतापले; म्हणाले – “मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो…”

नाशिक : Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आलेल्या आहेत. अशातच मविआ कडून अजित पवारांना लक्ष केले जात आहे. अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण वेश बदलून दिल्लीत गेल्याचे सांगितल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये आल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीआधी या भेटीगाठी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
यासंदर्भात आज नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, यावेळी त्यांनी विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे. माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले , ” मी गेले ५-६ दिवस झाले माध्यमात बघतोय, पेपरमध्ये वाचतोय राजकीय लोकांनीही विधानं केली आहेत की अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यासाठी अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. धादांत खोटं आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की हे बदनामी करण्याचं काम चालू आहे.
माझ्याबाबत गैरसमज करण्याचं काम चालू आहे. काहींनी पार अधिवेशनात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार नाव बदलून गेले म्हणे. मी ३५ वर्षं राजकीय जीवनात कार्यरत आहे. खासदार, आमदार, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं मी सांभाळली आहेत. एक जबाबदारी मलाही कळते.
एखाद्यानं नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. खुशाल काहीही बोललं जातंय. कोण बहुरुपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत”, असे अजित पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “सकाळचा ९ चा भोंगा लागतो त्यांनीही लगेच टीका करायला सुरुवात केली.
अरे काय केलं? उगीच उचलली जीभ, लावली टाळ्याला असं चाललंय.
तुम्हाला कुठे पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदलून प्रवास केला? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो.
मला समाज ओळखतो. कुणी म्हटलं मिशा लावल्या होत्या, टोपी घातली होती, मास्क घातलं होतं. साफ चुकीचं आहे.
जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन.
जर सिद्ध झालं नाही, तर ज्या लोकांनी पार संसदेपासून इथपर्यंत ही नौटंकी चालवली आहे,
त्यांना जनाची नाही, मनाची लाज वाटायला हवी. उगीच कुणीतरी एखादं चॅनल बातमी लावतं.
त्या बातमीचा कुठेही आधार नाही, पुरावा नाही. कॅमेऱ्यात तसं काही दृश्यही नाही.
फक्त माझी बदनामी करण्यासाठी केलं जात आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा