Ajit Pawar Plane Crash | “माझ्या अजितला भेटायचंय…” अनवाणी बाहेर पडलेल्या आशाताई पवारांचा काळीज चिरणारा क्षण
पुणे/बारामती : Ajit Pawar Plane Crash | बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला. या धक्कादायक घटनेचा सर्वात मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला असून, विशेषतः त्यांची आई आशाताई पवार यांची पहिली प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी ठरली आहे.
अपघाताची बातमी समजली तेव्हा आशाताई पवार आपल्या फार्महाऊसवर टीव्ही पाहत बसल्या होत्या. अचानक टीव्हीवर अजित पवार यांच्या अपघाताची बातमी झळकताच त्या सुन्न झाल्या. कुटुंबीय आणि कर्मचारी यांना ही बाब त्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले. तातडीने टीव्ही बंद करण्यात आला, केबल काढून टाकण्यात आली आणि त्यांच्या जवळील मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवण्यात आले. मात्र, आईचं मन काही चुकत नाही. आपल्या लेकावर काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव आशाताईंना झाली.
क्षणातच त्या भावनिक अवस्थेत घराबाहेर पडल्या. कोणतीही चप्पल न घालता, “माझ्या अजितला भेटायचं आहे,” असं म्हणत त्या थेट बाहेर निघून गेल्या. त्यांना थांबवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न झाला, मात्र लेकासाठी आईचं मन स्वस्थ बसायला तयार नव्हतं. अखेर नाईलाजाने कुटुंबीयांनी त्यांना बारामतीकडे नेण्याची तयारी केली.
ही घटना केवळ एका राजकीय नेत्याच्या जाण्याची नसून, एका आईने आपला मुलगा गमावल्याची वेदना व्यक्त करणारी ठरली आहे. आशाताई पवार यांच्या या अवस्थेने उपस्थितांचेही डोळे पाणावले. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बारामतीसह संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे.
