Ajit Pawar Plane Crash | बारामतीत शोकसागर; अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर
बारामती/काटेवाडी : Ajit Pawar Plane Crash | विमान अपघातात निधन झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अखेरचा निरोप देताना संपूर्ण बारामती तालुका शोकमग्न झाला होता. काटेवाडी येथे झालेल्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जनतेचा प्रचंड भावनिक प्रतिसाद पाहता परिसरात अक्षरशः जनसागर उसळला होता.
अंत्यदर्शनासाठी आलेल्या नागरिकांची संख्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक असल्याने गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार स्वतः मैदानात उतरले. त्यांनी पोलिस प्रशासनासह समन्वय साधत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. गर्दी चेंगराचेंगरीत रूपांतर होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार सातत्याने सूचनाही देत होते.
अंत्ययात्रेदरम्यान ‘अजितदादा अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर अनेकजण भावनांनी गहिवरलेले दिसत होते. अजित पवार यांचे बारामतीशी असलेले घट्ट नाते आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास या गर्दीतून प्रकर्षाने जाणवत होता.
दरम्यान, अंत्यसंस्कार शांततेत आणि शिस्तीत पार पडावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासन, स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले.
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, बारामतीसह संपूर्ण राज्य त्यांच्या आठवणींनी शोकाकुल झाले आहे.
