Akola Crime News | काही दिवसांनी मोठया बहिणीचं लग्न, पगार आणतो म्हणून घरातून गेला, तरुणाची चाकूने भोसकून हत्या

अकोला : Akola Crime News | तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हत्या झालेल्या तरुणाचे तीन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. करण शितळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विशाल वरोटे, वैभव शितळे यांच्यासोबत आणखी एक असे तिघे जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.२३)रोजी घडली.
अधिक माहितीनुसार, करण पगार आणण्यासाठी बाहेर जातो, असे आईला सांगून घराबाहेर पडला. त्याच्या घरी काही दिवसांनी मोठया बहिणीचे लग्न होणार आहे. त्यामुळे त्याची आई घर सफाईच्या कामात होती. काही वेळाने आईला करणचा फोन आला की मला काहीजण मारत आहेत. त्याची आई त्याला वाचवण्यासाठी हातातील सगळी कामं सोडून धावत त्याच्याकडे गेली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दरम्यान तातडीने त्याला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी करणला मृत घोषित केले. त्याच्यासोबत असलेले आणखी तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खदान पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. नेमकी हत्या का करण्यात आली? याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.