Amitabh Gupta – Jalindar Supekar | अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर यांना क्लिन चिट; शस्त्रपरवानाप्रकरणी गृहविभागाचे स्पष्टीकरण

Amitabh Gupta - Jalindar Supekar | Clean chit given to Amitabh Gupta, Jalindar Supekar; Home Department clarifies on arms license issue

पुणे: Amitabh Gupta – Jalindar Supekar |  पुणे शहर पोलिसांकडून अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करत गृहविभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. सर्व परवाने शस्त्र अधिनियम 1959 आणि शस्त्र नियम 2016 मधील अटी, शर्ती आणि तरतुदींचे पालन करूनच मंजूर करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्रपरवान्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती. तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातील सर्व शस्त्रपरवान्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. हगवणे प्रकरणातील नातेसंबंधांमुळे सुपेकर यांनी काही व्यक्तींना शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे आरोपही झाले होते.

विधिमंडळाने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीत या संदर्भातील माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे की, अमिताभ गुप्ता यांच्या सेवा कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत एकूण 433 शस्त्रपरवाने मंजूर करण्यात आले. हे सर्व परवाने संबंधित प्राधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींचे पालन करूनच दिले आहेत.

गृहविभागाच्या स्पष्टीकरणानंतर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावरील शस्त्रपरवाना प्रकरणातील आरोपांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, विविध गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही वरिष्ठ आयपीएस अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून तुलनेने कमी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याचेही नमूद केले जात आहे.

कोणतीही अवैध किंवा असंपादित मालमत्ता आढळून न आल्याने चौकशी बंद

दरम्यान, जालिंदर सुपेकर आणि त्यांचे मेहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्तांबाबतही आरोप झाले होते. यासंदर्भात गृहविभागाने स्पष्ट केले की, सुपेकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यात कोणतीही अवैध किंवा असंपादित मालमत्ता आढळून न आल्याने ही चौकशी बंद करण्यात आली आहे.

You may have missed