Ashok Kharat | नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे ‘मायाजाल’; 8 वर्षांत संस्थानच्या संपत्तीत 74 पटींनी वाढ!

Ashok Kharat | Nashik's 'magical' scammer Ashok Kharat; The wealth of the Sansthan has increased by 74 times in 8 years!

नाशिक : Ashok Kharat | महिलांवरील अत्याचार आणि भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याच्या आर्थिक व्यवहारांतून आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातच्या ‘श्री शिवनिका संस्थान’च्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा मोठा खेळ सुरू असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठ वर्षांत या संस्थानच्या उत्पन्नात तब्बल ७४ पटींनी वाढ झाल्याचे धर्मादाय आयुक्तालयाच्या लेखापरीक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अफाट संपत्तीच्या आकड्यांनी आता तपास यंत्रणांचेही डोळे विस्फारले आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये या संस्थानची एकूण मालमत्ता केवळ ४ लाख ६७ हजार रुपये इतकी होती. मात्र, अवघ्या दोन वर्षांत म्हणजेच २०१९-२० मध्ये हा आकडा थेट १ कोटी ४१ लाखांवर पोहोचला. खरातच्या भोंदूगिरीचा विस्तार जसा वाढत गेला, तशी या संपत्तीतही मोठी भर पडत गेली. २०२४-२५ या आर्थिक वर्षापर्यंत ही मालमत्ता २ कोटी १५ लाख ११ हजार रुपयांच्या वर गेली असून, केवळ २०२४ या एकाच वर्षात संस्थानच्या झोळीत ७६ लाख ९१ हजार रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना महागडे खडे विकणे आणि अघोरी पूजांच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळून ती थेट संस्थानच्या खात्यात जमा केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

केवळ ही अधिकृत मालमत्ताच नव्हे, तर खरातकडे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून सुमारे २०० ते ५०० कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामध्ये ५२ सातबारा उतारे, आलिशान बंगले आणि फार्महाऊसचा समावेश असून, एका जमीन व्यवहारामध्ये तर एका बड्या महसूल अधिकाऱ्याच्या पत्नीचे नावही समोर आल्याने खळबळ माजली आहे. खरातच्या या वाढत्या प्रभावामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे, कारण तत्कालीन सरकारने या संस्थानसाठी दारणा धरणातून चक्क ३९ लाख लिटर पाणी आरक्षित केले होते.

सध्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. खरातच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, लवकरच या प्रकरणातील काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोंदूगिरीच्या आडून रचलेले हे आर्थिक साम्राज्य आता कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकले असून, आगामी काळात यातून आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.

You may have missed