Bapu Pathare MLA | बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी बीआरटी मार्ग हटविण्याची आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी
पुणे : Bapu Pathare MLA | बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी दरम्यान असलेला बीआरटी मार्ग हटविण्याची मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांची भेट घेऊन पठारे यांनी निवेदन दिले. यावेळी संबंधित विषयावर सखोल चर्चा पार पडली.
सदर मार्गावर बीआरटीमुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हा बीआरटी मार्ग तातडीने हटवून वाहतूक अधिक सुलभ व सुरळीत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे सध्याची वाहतूक व्यवस्था ताणली गेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी व्यावहारिक निर्णय घेणे आवश्यक आहे. बीआरटी मार्गामुळे निर्माण होणारी कोंडी दूर करणे ही तातडीची गरज असून वाहतूक सुलभ करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवरही भर देणे गरजेचे आहे.”
नागरिकांच्या सोयीसाठी तसेच वाहतूक व्यवस्थेच्या सुधारासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आमदार पठारे यांनी केली. या मागणीवर आव्हाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विषयाचा गांभीर्याने विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहरातील वाहतूक समस्या कमी करण्याच्या दृष्टीने या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
