Bapu Pathare MLA | दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंबंधी आमदार बापूसाहेब पठारे आग्रही
नागपूर: Bapu Pathare MLA | हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रश्नोत्तर सत्रात राज्यातील दिव्यांग नागरिकांच्या हितासंबंधी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. दिव्यांगांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी शासन ठोस नियमावली तयार करणार का, बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याने खऱ्या दिव्यांगांचे नुकसान होत असल्यावर काय उपाययोजना केल्या जाणार तसेच प्रमाणपत्रासाठी अर्ज करूनही अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने तातडीने प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणती कार्यवाही होणार, असे प्रश्न त्यांनी मांडले.
प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन (यूडीआयडी) कार्ड सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरीस सर्व विभागांनी यूडीआयडी कार्ड शिवाय कोणताही लाभ देऊ नये. याशिवाय किमान ४० टक्के दिव्यांगत्वाची अट लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयांनी किमान दोन दिवस ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दिव्यांग बांधवांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी यावेळी सांगितले.
