Bapu Pathare MLA | लोहगाव-वाघोली परिसरातील रस्ते व मूलभूत कामांची आमदार बापूसाहेब पठारे यांची पाहणी

Bapu Pathare MLA | MLA Bapusaheb Pathare inspects roads and basic works in Lohegaon-Wagholi area

लोहगाव: Bapu Pathare MLA | लोहगाव व वाघोली परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसह व प्रभाग क्रमांक ०३ मधील नगरसेवकांच्या उपस्थितीत सविस्तर पाहणी दौरा केला. यावेळी प्रत्यक्ष कामांची पाहणी करून संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.

लोहगाव स्मशानभूमी परिसरातील दुरवस्था लक्षात घेऊन गेट उभारणी, वॉचमन व केबिन व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच परिसर स्वच्छतेबाबत निर्देश देण्यात आले. लोहगाव-वाघोली मार्गावरील पंकज आसमान सोसायटी परिसरात खोदकामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक अडचणी तत्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच फुटलेल्या ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

संतनगर परिसरातील रस्ते व पाईपलाईन कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. निरगुडी रस्ता, वडगावशिंदे रस्ता, धानोरी-लोहगाव-वाघोली ८० फुटी रस्ता, डी.वाय. पाटील रस्ता आदी प्रमुख मार्गांचे रुंदीकरण व डांबरीकरण तातडीने करण्यावर भर देण्यात आला.

लोहगावमधील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आमदार पठारे यांनी दिले. या पाहणीवेळी नगरसेविका ऐश्वर्या पठारे, डॉ. श्रेयस खांदवे, नगरसेवक रामदास दाभाडे, अनिल सातव तसेच पथ विभागाचे अधीक्षक अभियंता आशिष जाधव, कार्यकारी अभियंता संजय धारव, उपअभियंता पौर्णिमा गायकवाड, प्रशांत मोरे, कनिष्ठ अभियंता सारंग देवरे, प्रफुल्ल भटकर (भवन विभाग) यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

“लोहगाव-वाघोली परिसरातील मूलभूत सुविधा सक्षम व सुस्थितीत करण्यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू राहील”, असा विश्वास आमदार बापूसाहेब पठारे यांनी यावेळी व्यक्त केला.

You may have missed