Bapu Pathare MLA | मेट्रो विस्तारासाठी आमदार बापूसाहेब पठारे आग्रही; महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी सविस्तर चर्चा
पुणे: Bapu Pathare MLA | पुणे शहर व परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुढाकार घेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर यांची आज पुणे येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बैठकीत पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (कटकेवाडी) ते शिक्रापूर/रांजणगाव (ता. शिरूर) तसेच पुणे विमानतळ ते विश्रांतवाडी मार्गे आळंदीपर्यंत मेट्रो मार्ग विस्तारीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढत्या नागरीकरणामुळे या पट्ट्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सद्यस्थितीला वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग कार्यान्वित असून रामवाडी ते वाघोली (कटकेवाडी) पर्यंतचा विस्तार प्रगतीपथावर आहे. यानंतर वाघोलीहून पुढे शिक्रापूर किंवा रांजणगाव पर्यंत मेट्रो मार्ग विस्तारित केल्यास पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच या भागातील औद्योगिक व निवासी विकासाला चालना मिळून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे बैठकीत पठारे यांच्याकडून नमूद करण्यात आले.
तसेच पुणे विमानतळ हे राज्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असल्याने तेथून विश्रांतवाडी मार्गे आळंदीपर्यंत मेट्रो मार्ग विकसित करणे अत्यावश्यक असल्याचे मत पठारे यांनी व्यक्त केले. या मार्गामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना सुलभ, जलद व सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपले मत मांडताना सांगितले की, “पुणे शहराचा विस्तार वेगाने होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना परवडणारी, सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. ही सुविधा शहरापुरती मर्यादित न ठेवता उपनगर व औद्योगिक पट्ट्यांपर्यंत मेट्रो पोहोचली पाहिजे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल.”
तसेच या दोन्ही प्रस्तावांसाठी सविस्तर तांत्रिक व व्यवहार्यता अहवाल तातडीने तयार करून पुढील कार्यवाही सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पुणे शहराच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासासाठी मेट्रो विस्तार हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा आमदार पठारे यांनी व्यक्त केली.
