Bapu Pathare MLA | पिंपरी चिंचवड महापालिकेकडून निरगुडी गावाला पाणीपुरवठा होणार – आमदार बापूसाहेब पठारे
पुणे: Bapu Pathare MLA | मौजे निरगुडी गावातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत नळजोड मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
निरगुडी गावाचा पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर इंद्रायणी नदीलगत असून जवळच असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे २१ दशलक्ष लिटर मैलाशुद्धीकरण केंद्रातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे विहिरीतील पाणी अत्यंत दूषित झाले होते. आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आले होते. या गंभीर बाबी लक्षात घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी हा प्रश्न महापालिका, विधानमंडळात व शासन पातळीवर सातत्याने मांडला.
त्यांच्या प्रयत्नांतून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेतील ठरावानुसार निरगुडी गावासाठी १०० मिमी (४ इंच) व्यासाचे नळजोड मंजूर करण्यात आले आहे. पाण्याचा दर प्रति हजार लिटर नऊ इतका राहणार असून दरवर्षी पाच टक्के दरवाढ लागू राहील. पाण्याचा मीटर ग्रामपंचायतीने स्वखर्चाने बसवणे, मासिक पाणीदेयके वेळेत भरणे तसेच मीटरची देखभाल करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीची राहणार आहे. पाणीपुरवठा हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भामा-आसखेड आणि आंध्र प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निरगुडी गावातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळणार आहे.
आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून नागरिक त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करत आहेत.
