Bapu Pathare MLA | येरवडा कारागृहासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे – आमदार बापूसाहेब पठारे; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : Bapu Pathare MLA | येरवडा येथील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. येरवडा कारागृहातील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालय येथे नेण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान काही वेळा आरोपी पळून जाण्याच्या घटना घडल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृह परिसरातच स्वतंत्र, विशेष सुरक्षा असलेले रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार पठारे यांनी केली. मागील २०२५ च्या अधिवेशनातही त्यांनी हीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, याचीही त्यांनी सभागृहात आठवण करून दिली.
कारागृहासमोरच न्यायालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे या संपूर्ण परिसरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यास आरोपींना बाहेर नेण्याची आवश्यकता कमी होईल. परिणामी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि पोलीस यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पुणे शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या (ड्रग्स) समस्येवर कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. युवकांमध्ये वाढणारे व्यसन आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, असेही पठारे यांनी सांगितेल.
यावर उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, येरवडा कारागृहात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ससून रुग्णालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारण्याची कार्यवाहीही प्रगतिपथावर आहे.
“येरवडा कारागृह परिसरातच स्वतंत्र आणि सुसज्ज विशेष रुग्णालय उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे आरोपींना बाहेर नेण्याची गरज कमी होईल, पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि सुरक्षेची पातळी अधिक भक्कम होईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. तसेच शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या समस्येवर कठोर कारवाईसाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी,”
– आमदार बापूसाहेब पठारे
