Beed News | पत्नीच्या अंगावरील सोनं मोडून 5 गावांची भागवली तहान, ‘जलदूता’चं राज्यभरात होतंय कौतुक

बीड: Beed News | जिल्ह्यामधील गावांमध्ये पाण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागते. प्रत्येक घरातील महिलांची पाण्यासाठीची होत असलेली पायपीट एका तरुणाला बघवली नाही. यासाठी त्याने थेट गावची तहान भागवण्यासाठी आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोअरवेल घेतला. या बोअरवेलला इतकं पाणी लागलं की, एका गावासह पाच गावाची तहान देखील भागवली जाते.
मात्र, कालांतराने या बोअरचंही पाणी कमी पडू लागले आहे. त्यात त्याने कोणाचीही आर्थिक मदत न घेता अजून एक बोअरवेल घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्पामुळे उन्हाळ्यात आता अनेक गावांची तहान भागत आहे. जरूड गावचा राजेश काकडे हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जात आहे.
गावाला पाणी देण्यासाठी राजेशने स्वत:च्या शेतातील बाजरी, डाळिंब आणि मोसंबीचे पीक वाया जाऊ दिलं. त्यामुळे शेती आणि लाखोंचा खर्च मातीमोल झाला. मात्र, तरीही त्याने हार मानली नाही. आपला संकल्प पूर्ण करत गावांना पाणी दिले. त्याच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.