Belgaum Crime News | नाळ कापून अर्भकाला पोत्यात घातलं अन् शेतवडीतील उकीरड्यावर फेकून दिलं, प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या अर्भकाचा खून, प्रेमीयुगुलावर गुन्हा दाखल

Crime News

बेळगाव : Belgaum Crime News | प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या अर्भकाचा खून केल्याप्रकरणी प्रेमीयुगुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर कामोजी (वय-३१) व सिमरन माणिकभाई (वय-२२, दोघेही रा. अंबडगट्टी) अशी अटक केलेल्या संशयित प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ५ मार्च रोजी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी येथे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला होता. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर पोलिसांनी या प्रेमीयुगुलाचा शोध घेत रविवारी त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही संशयित तरुण व तरुणी अंबडगट्टी येथे एकाच गल्लीत राहतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. यातून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून सिमरन गर्भवती राहिली. विशेष म्हणजे गर्भवती असल्याचे सिमरनने तब्बल ९ महिने घरच्यांना अथवा इतर कोणालाही माहिती होऊ दिली नाही.

५ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सिमरनच्या पोटात दुखू लागले. प्रसूतीची लक्षणे दिसू लागल्यानंतर ती थेट बाथरूममध्ये गेली. तिने प्रियकर महाबळेश्वरला व्हिडीओ कॉल लावत सर्व प्रकार सांगितला. तो कॉलवर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करेल त्यानुसार तिने बाळाला जन्म दिला. महाबळेश्वरने सांगितल्यानुसार नाळ कापून काढत सदर अर्भकाला तिने एका पोत्यात घातले. यावेळी बाळ ओरडू नये अथवा त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिने त्याचे तोंड दाबून धरले होते. घाईत पोत्यात भरताना त्याच्या डोक्यालाही मार लागल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

यानंतर तिने हे पोते महाबळेश्वरला बोलावून त्याच्याकडे दिले. त्याने हे पोते नेऊन गावच्या बाजूलाच असलेल्या शेतवडीतील उकीरड्यावर फेकून दिले. तोपर्यंत बालक मृत झाले होते. याबाबतची माहिती कित्तूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिवानंद यांच्यासह उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर हे अर्भक येथे कोठून आले, याचा शोध सुरू झाला.

उत्तरीय तपासणीच्या अहवालात डोक्यात जखम असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांना एक दिशा मिळाली. अनैतिक संबंधातून हे प्रकरण घडले असण्याच्या शक्यतेने एक आव्हान म्हणून कित्तूर पोलिसांनी तपास सुरू केला त्यामध्ये त्यांना यश मिळाले.

You may have missed