Bhairoba Nala to Yavat Flyover | पुणे : भैरोबा नाला ते यवतपर्यंत होणार 5,262 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल; मेट्रोचीही तरतूद! राज्य सरकारची पायाभूत समिती प्रकल्पाला मंजूर

Bhairoba Nala to Yavat Flyover | Flyover from Bhairoba Nala to Yavat Approved in Pune; Metro Integration Included

पुणे : Bhairoba Nala to Yavat Flyover | पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा सामना करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पायाभूत समितीने या विस्तारित प्रकल्पाला मंजुरी दिली असून, हा सहापदरी उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत उभारला जाणार आहे. या मार्गात मेट्रोसाठीही विशेष तरतूद केली जाणार आहे.

हडपसर ते यवतदरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक कोंडी तीव्र झाली होती. त्यामुळे या मार्गावर सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रकल्पाची लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढवून भैरोबा नाल्यापासून उड्डाणपूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या उड्डाणपुलाची एकूण लांबी ३९ किलोमीटर होणार आहे.

५,२६२ कोटींचा हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार असून, पूर्ण झाल्यानंतर सर्व वाहनांसाठी टोल आकारला जाणार आहे. निविदेनंतर देण्यात येणाऱ्या वर्क ऑर्डरपासून तीन वर्षांत काम पूर्ण करणे बंधनकारक असेल. प्रकल्पातील भूसंपादनाची जबाबदारीही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गात मेट्रो मार्गाचाही समावेश करण्याच्या सूचना दिल्या असून, भविष्यात शहरात भुयारी मार्गांचे जाळे विकसित करण्याचीही कल्पना त्यांनी मांडली.

You may have missed