Bhor Panchayat Samiti Election | भोर पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती; संग्राम थोपटेंना धक्का, आमदार शंकर मांडेकर ठरले सरस

Bhor Panchayat Samiti Election | NCP's chairman in Bhor Panchayat Samiti; Sangram Thopte shocked, MLA Shankar Mandekar becomes the best

पुणे : Bhor Panchayat Samiti Election |  भोर पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड आज पार पडली, आणि या निवड प्रक्रियेदरम्यान मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ‘ईश्वरी चिठ्ठी’च्या माध्यमातून सभापती पदाचा निर्णय घेण्यात आला.

पंचायत समितीचे सभापतीपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव आहे. भोर तालुक्यात एकूण ८ गण असून दोन्ही पक्षांचे ४-४ असे समसमान संख्याबळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती खुटवड आणि मनीषा कंक, तर भाजपकडून गीता आंबवले आणि सुषमा चव्हाण या चार महिला उमेदवार रिंगणात होत्या.

संख्याबळ समान असल्याने अखेर चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा कंक यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्या भोर पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या. तर विशाल कोंडे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.

भोर नगरपालिकेचे अध्यक्षपद गमावल्यानंतर आता पंचायत समितीचे सभापतीपदही हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

सलग तिसरे अपयश

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भोर नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात आली. मात्र त्या निवडणुकीतही आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आला.

आता भोर पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने, थोपटे गटाला सलग तिसऱ्या राजकीय पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

You may have missed