Bhushansingh Raje Holkar | ‘वाघ्या श्वान प्रकरणाला जातीय रंग’, भूषणसिंह राजे होळकर संतापले; म्हणाले, ” होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत, मुख्यमंत्र्यांनी… “

पुणे : Bhushansingh Raje Holkar | रायगडावरील वाघा श्वानाच्या स्मारकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
भूषणसिंह राजे होळकर यांनी वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. त्यामध्ये संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्या सारख्या अभ्यासकांना समितीत घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी शासनाने मध्यस्थी करावी. होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? असा सवाल भूषणसिंह राजे होळकर यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले, संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालण्याची गरज आहे. होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे, होळकर इंग्रजांना घाबरत होते असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या संघटनांना समज द्यावी आणि हा वाद योग्य पद्धतीने सोडवावा. आमच्या घराण्याने शिवरायांसाठी दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा. तुकोजी होळकर यांच्या स्मरणार्थ रायगडावर फलक लावावा. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा संपूर्ण विषय मांडणार आहे. तसेच, ताराराणीच्या समाधीच्या संवर्धनावर भर द्यावा, औरंगाबादच्या कबरीपेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकीय हेतूने कोणीही ऐतिहासिक सत्य बदलण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय स्वरूप दिले जाते. मात्र हा विषय ऐतिहासिक आहे आणि तो तसाच पाहिला जावा, असे भूषणसिंह राजे होळकर यांनी म्हंटले आहे.