Brahmnad Sangeet Mahotsav | 23वा ब्रह्मनाद संगीत महोत्सव रंगणार शनिवार-रविवारी

आरती ठाकूर-कुंडलकर, पं. प्रसाद खापर्डे, पं. श्रीनिवास जोशी, हेमा उपासनी आणि पं. संजय गरुड यांचे गायन तर सहाना बॅनर्जी यांचे सतारवादन
पुणे : Brahmnad Sangeet Mahotsav | ब्रह्मनाद कला मंडळ आयोजित 23व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे शनिवार, दि. 20 आणि रविवार, दि. 21 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय महोत्सवात पुणेकर रसिकांना प्रसिद्ध कलाकारांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात ह. भ. प. मारुतीराव गरुड (पखवाज वादक) स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने भजनसम्राट गुरुवर्य पंडित सीतारामबापू सरोदे यांचा गौरव केला जाणार आहे.
महोत्सव सायंकाळी 6 ते 9 या वेळात गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे होणार आहे, अशी माहिती ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजक, प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेच्या सचिव रागिणी संजय गरुड, सुभाष चाफळकर उपस्थित होते. ब्रह्मनाद कला मंडळाची स्थापना किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांनी 1999 साली केली. मंडळातर्फे पुण्याच्या पश्चिमेकडील धायरी-सिंहगड रोड परिसरात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार केला जात आहे. आतापर्यंत आयोजित महोत्सव आणि कार्यक्रमांमध्ये अनेक ज्येष्ठ व नामवंत कलाकारांचे सादरीकरण झाले असून नवोदित कलाकारांना स्वरमंच उपलब्ध करून दिला आहे. संस्थेतर्फे पहिल्यांदाच पुण्याच्या मध्यवर्ती भागात महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या पहिल्या (दि. 20) दिवसाची सुरुवात विदुषी प्रभाताई अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आणि किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आणि रामपूर सहस्वान घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित प्रसाद खापर्डे यांचे गायन होणार असून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या (दि. 21) दिवसाच्या प्रथम सत्रात भजनसम्राट गुरुवर्य पंडित सीतारामबापू सरोदे (शिरूर) यांचा ब्रह्मनाद पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार, मा. आ. उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्यानंतर कोलकाता येथील प्रसिद्ध कलाकार सहाना बॅनर्जी यांचे सतार वादन होणार आहे.
सांगीतिक वारसा लाभलेल्या सहाना बॅनर्जी या प्रसिद्ध गायिका छाबी बॅनजी आणि सुप्रसिद्ध सतार-सूरबहार वादक पंडित संतोष बॅनजी यांच्या कन्या आहेत.
त्यानंतर पंडित नाथ नेरळकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध गझल गायिका हेमा उपासनी यांचे गायन होणार आहे.
महोत्सवाचा समारोप पंडित श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या गायनाने होणार आहे.
विदुषी प्रभाताई अत्रे, उस्ताद राशिद खान आणि पंडित नाथ नेरळकर यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या शिष्यांना
या महोत्सवात आवर्जून निमंत्रित करण्यात आले आहे. (Brahmnad Sangeet Mahotsav)
कलाकारांना सुयोग कुंडलकर, तुषार केळकर (संवादिनी), भरत कामत, रोहन पंढरपूरकर, महेश साळुंखे,
ऋषिकेश जगताप (तबला), माऊली फाटक, ऋग्वेद जगताप (पखवाज) साथसंगत करणार आहेत.
तर निवेदन मंगेश वाघमारे यांचे आहे. महोत्सव सर्व संगीतप्रेमींसाठी खुला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार