Buldhana Crime News | अवैध दारू माफियाचा पाठलाग, दुचाकीला धक्का दिल्याने अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, बीट जमादार गंभीर जखमी

Buldhana Crime (1)

बुलढाणा : Buldhana Crime News | अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला दारू विक्रेत्याने लाथ मारल्याने पोलिसांची दुचाकी झाडावर आढळून झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बीट जमादार गंभीर जखमी झाले आहेत. भागवत गणेश गिरी (वय-३०) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना (दि.२३) शेळगाव आटोळ शिवारात घडली. दरम्यान पोलिसांनी अवैध दारू माफियाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अधिक माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील अवैध दारू माफिया संजय उत्तम शिवणकर हा दुचाकी वर अवैध दारूचे बॉक्स घेऊन जाताना पोलिसांना दिसला. यावेळी बीट जमादार रामेश्वर अवचितराव आंधळे आणि पोलिस कॉन्स्टेबल भागवत गिरी यांनी अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा सिनेस्टाईल पाठलाग केला. पोलिस हे आपल्या जवळ आल्याचे पाहून अवैध दारू विक्रेत्याने चालत्या दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलिसांचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेवर एका झाडावर आदळली.

हा अपघात एवढा गंभीर होता की डोक्याला गंभीर मार लागून भागवत गिरी या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी बीट जमादार रामेश्वर आंधळे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अवैध दारू विक्रेता संजय उत्तम शिवणकर याला अटक केली आहे.

You may have missed