Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईटवर पुणे शहरात बंदी घालावी; सुनील माने यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
पुणे – Catalyst Foundation Pune | मानवी आरोग्यास हानिकारक असणार्या डीजे, लेझर लाईट तसेच ध्वनीप्रदुषणास कारणीभूत ठरणार्या घटकांवर पुणे शहरात बंदी आणावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हल्ली सर्वच धर्मियांच्या सण, उत्सव,महापुरुषांच्या जयंतीमध्ये, धार्मिक अथवा वैयक्तिक कार्यक्रमात डी.जे आणि लेझर लावण्याचे प्रमाण वाढले आहे. डीजेचा कर्णकर्कश्य आवाज, लेझरचा अमर्यादित वापर यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. डीजेमुळे काहींना कायमचे बहिरेपण आले आहे तर काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेली आहे. मागील वर्षीच्या गणेश उत्सवानंतर डीजे आणि लेझरच्या दुष्परिणामा संदर्भातील बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या.
हल्ली सण उत्सव व महापुरुषांच्या जयंतीमध्ये इलेक्ट्रॉनिक व तांत्रिक गोष्टी वापरून गोंगाट निर्माण करण्याची फॅशन झाली आहे. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी या गोष्टींना पाठींबा देत आहेत. आपली परंपरा संस्कृती काय आहे आणि आपण कुठल्या दिशेला चाललोय याचाच भान सर्व समाजाला सुटत चाललंय. गरोदर महिला, परीक्षार्थी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांना याचा त्रास होतो . जिल्ह्यातले सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या ससूनच्या बाहेर ही जोरजोरात डीजे लावला जातो ही शोकांतिका आहे. साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी, त्याची आवाज मर्यादा किती असावी याबाबत सुप्रीम कोर्टाने गाईड-लाईन आखून दिल्या आहेत. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन केले जाते.
या उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या पोलिसांना या मिरवणुकीसोबत चालावे लागते अथवा त्याच्या समोर थांबावे लागते, त्यांनाही याचा त्रास सहन करवा लागतो.
अनेक पोलिसांना उत्सवा नंतर रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागतात.
माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. लेझरच्या अतिनील किरणांमुळे ही अनेकांना अंधत्व आले आहे.
त्यामुळे डीजे सोबतच ध्वनी प्रदूषण करणारे सर्व घटक, लेझर, प्लाज्मा लाईटचेही व्यापक दुष्परिणाम बघता
या घटकांवर आपण पुणे शहरात बंदी घालावी तसेच सर्व सण आणि महापुरुषांच्या जयंत्या इत्यादी कार्यक्रमांत डीजे व
लेझरला परवानगी देऊ नये अशी विंनती त्यांनी या पत्राद्वारे अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर