CBSE News | मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
पुणे : CBSE News | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शालेय शिक्षणात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत आणि विषयांची निवड यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत.
सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता तीन भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये दोन भारतीय भाषांचा समावेश असणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि इतर प्रादेशिक भाषांचे ज्ञान मिळेल. या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित करणे आणि त्यांना भारतीय संस्कृतीशी अधिक जवळून जोडणे हा आहे.
दुसरीकडे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांचे दोन स्तर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांची शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना ‘बेसिक’ (पायाभूत) किंवा ‘स्टँडर्ड’ (प्रगत) यापैकी एका स्तराची निवड करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात या विषयात करिअर करायचे नाही, त्यांना सोप्या स्तराचा पर्याय निवडता येईल, ज्यामुळे त्यांच्यावरील अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत होईल.
