Chandrakant Patil | पुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार ! शिरुरच्या माजी आमदारांच्या कुटुंबियांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
पुणे : Chandrakant Patil | जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आ. राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे माजी आमदार संजय जगताप प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे, धर्मेंद्र खांडरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश माननीय मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
