Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येसाठी अघोरी विद्येचा प्रयोग; उशीखाली सुई टोचलेली बाहुली; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल; पत्नीला अटक

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | पत्नीने उपजिल्हाधिकारी पतीला ठार मारण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र कटके असे उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. पत्नी सारिका कटके हिने पतीला मारण्यासाठी विषप्रयोग आणि अघोरी विद्येचा वापर केल्याची माहिती आहे. देवेंद्र कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्रासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, देवेंद्र कटके यांनी सारिका हिच्यासोबत २००० साली आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. लग्नाच्या काही दिवसात सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा तगादा लावला होता. मात्र, अनुसूचित जातीत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे लाभ बंद केल्याच्या शासन निर्णयानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच सारिकाच्या वागणुकीत बदल झाला.
कटके यांनी आपल्या कारला सुरक्षेच्या कारणास्तव जीपीएस यंत्रणा बसवली आहे. ही स्कोडा कार त्यांची पत्नी वापरते. ३ मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचे लक्षात येताच कटके यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ती कार केंब्रिज चौकात उभी होती. त्याच्या शेजारी आरोपी विनोद उबाळे यांची कार होती.
विनोद उबाळे हा सारिका ज्या शाळेचा कारभार सांभाळते त्याच्या जवळील एका हॉटेलचा मालक आहे. उबाळे आणि सारिका हे एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. येथे उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यांच्याविरोधात जातीवाचक शब्द वापरण्यात आल्याचा कटकेंचा आरोप आहे.
सारिकाने आई, विनोद उबाळे याच्या मदतीने कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घरात कटके यांच्या गादीखाली काळं झालेलं लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळल्याचेही कटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.